दुःखातून मुक्त होणे , हाच जीवनाचा हेतू !

Share:


दुःखातून मुक्त होणे , हाच जीवनाचा हेतू  !



बुद्धांच्या दुःखमुक्तीच्या मार्गाचा विचार करण्या पूर्वी त्यांच्या शिकवणुकीचा तीन लक्षणे समजून घेणे आवश्यक आहे . कारण दुःख निर्मिती हि दुःख मुक्तीशी निगडित आहे . 
ते म्हणजे अनित्य , अनात्म आणि दुःख अशी हि तीन लक्षणे आहेत .
तथागत बुद्ध म्हणतात ; सर्व वस्तू अनित्य आहेत व जे अनित्य आहे , ते दुःख आहे . मानवी जीवनात दुःखमुक्तीचा मार्ग शोधला पाहिजे . मानवी जीवन अमूल्य असून , या जीवनाची तुलना आपण कश्यासोबतही करू शकत नाही .
त्या मुळे जीवन सार्थक करण्यासाठी प्रत्येक मनुष्य झटत असतो . त्यामुळे या जीवनाचे सार्थक झाले पाहिजे किंवा दुसऱ्याची सेवा करण्यासाठी झिजले पाहिजे , तरच आपल्या जीवनात आनंद निर्माण होतो . 

परंतु , आपल्या जीवनात दुसर्याबद्दल ईर्षा , द्वेष निर्माण होत असेल , तर दुःख निर्माण झाल्याशिवाय राहत नाही .
                  तथागत बुद्ध म्हणतात  कि , हे जीवन दुःखमय आहे , दुःखाला कारण आहे . दुःख निरोध करणे , हा त्यावर उपाय आहे . 
या करीता तथागत बुद्धांनी चार आर्यसत्य सांगून अगदी सोप्या जनसामान्यांच्या भाषेमध्ये आपले तत्वज्ञान जगाला सांगितले आहे . तथागत बुद्धांच्या तत्वज्ञानानुसार , आपण जर आपले आचरण केले असेल , तर या जगात दुःखच राहणार नाही व संपूर्ण जग दुःख मुक्त होईल . दुःखातून मुक्त होणे , हा प्रत्येकाच्या जीवनाचा हेतू असला पाहिजे . या जगामध्ये अनेक प्रकारचे प्राणी राहतात .  त्या पैकी काही पाय असणारे व काही पाय नसणारे असतात . काही पाण्यात राहणारे असतात , तर काही जीव जमिनीवर राहणारे असतात . काही उडणारे असतात , तर काही सरपटणारे असतात . 
परंतु , या सर्व सजीव प्राण्यांमध्ये मनुष्यच असा एक प्राणी आहे कि , 
त्याच्या कडे बुद्धी आहे , प्रज्ञा आहे आणि त्या प्रज्ञेच्या बलावर आपण आपला विकास करू शकतो , आणि म्हणून मनुष्य प्राणी हा इतर सजीव प्राण्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ समजला जातो . बुद्धीच्या प्रभावाने मनुष्य विविध क्षेत्रात प्रगती करू शकतो . मनुष्याकडे बौद्धिक क्षमता असल्यामुळे आपण भौतिक दुःखापासून मुक्ती मिळवू  शकतो . आपले ध्येय कठोर परिश्रम करून मनुष्य सहज प्राप्त करू शकतो .

 परंतु  ,काही लोक आपले  ध्येय साध्य झाले नाही , तर आपल्या नशिबाला दोष देतात . परंतु ते योग्य नाही . कारण तथागत बुद्धांनी कम्मसिद्धान्त सांगितलेला आहे .
 जे काही चांगले किंवा वाईट घडते , ते आपण केलेल्या चांगल्या किंवा वाईट कृत्यामुळे घडत असते . आपण जर चांगले कार्य केले असेल , तर त्याचे फळ निश्चित चांगलेच मिळते आणि आपण जर वाईट कर्म  केले असेल , तर त्याचा परिणाम वाईटच होणार आहे .

म्हणून जर आपल्याला दुःखमुक्त जीवन जगायचे असेल , तर प्रत्येकाने काया , वाचा , मानाने हिंसा करण्यापासून , चोरी करण्यापासून , कामवासनेपासून , खोटे बोलण्यापासून आणि आरोग्यास हानिकारक असलेल्या व्यसना पासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे व त्या केलेल्या प्रतिज्ञेनुसार आपण आपल्या आचरणात बदल करून घेतला पाहिजे .

कारण परिवर्तन हा , जगाचा नियम आहे ।

जेथे परिवर्तन आहे , तेथे प्रगती आहे । त्या साठी हे परिवर्तन आपण स्वतः पासून केले पाहिजे . याचाच अर्थ आपण स्वतःला बदलले पाहिजे . 
दुसऱ्यांनी आधी बदलले पाहिजे , हि आपली अपेक्षा आपल्याच दुःखाला कारणीभूत ठरत असते . म्हणून आपण स्वतःला बदलून पंचशीलेच्या तत्वाचे पालन केले , तर आपण आपल्या जीवनात पूर्णत्व प्राप्त करू शकतो .

यालाच तथागत बुद्धांनी निर्वाण अर्थात सुखी जीवनाचा मार्ग म्हटले आहे ;

मनुष्य स्वतः अनेक समस्यांना कवटाळून बसतो . मोह - मायेचा डोंगर नेहमी आपल्या डोक्यावर घेऊन जीवन जगत असतो . अनेक वस्तूंचा हव्यास त्याला लागलेला असतो , लोभ असतो  आणि तो हव्यास पूर्ण झाला नाही , तर त्याला दुःख निर्माण होते .

 म्हणून तथागत बुद्ध म्हणतात कि , तुष्णा हे दुःखाचे मूळ कारण आहे .


त्यामुळे आपण या लोभापासून अलिप्त राहिलें पाहिजे । विनाकारण कोणत्याही गोष्टीचा हव्यास धरू नये .
त्यामुळे आपले जीवन दुःखमुक्त होते आणि आपण सुखी जीवन जगू शकत नाही .
म्हणून आपण नेहमी सकारात्मक  विचार करीत आनंदित राहिलें पाहिजे . दुसऱ्यांची झालेली प्रगती पाहून आपण त्याच्याविषयी कधीही द्वेष किंवा  ईर्षा निर्माण करू नये .  त्या उलट त्याच्या बरोबरीने आपली प्रगती कशी होईल , या साठी विविध मार्गाचा शोध घेतला पाहिजे , कठोर परिश्रम केले पाहिजेत . त्यासाठी मनात सदैव कुशल विचार असले पाहिजे .


सकारात्मक विचारामुळे आपल्या मनात सकारात्मक वलय निर्माण होत असतात , तर नकारात्मक  विचारामुळे तश्या प्रकारचे नकारात्मक वलय निर्माण होत असतात .

कुशल विचारामुळे मन आनंदी राहते , म्हणून सदैव कुशल विचार करणे  हा दुःख मुक्तीचा उत्तम मार्ग आहे .

या उलट आपल्या मनात जर अकुशल विचार निर्माण होत असतील , तर त्या पासून दुःख निर्माण होते . 
आपल्या अतोनात हव्यासापोटी अर्थात तुषणेपोटी आपले मन कधीच समाधानी होत नाही . 
माणसाची तुष्णा कधीही शांत होत नाही .

बऱ्याच लोकांचे आयुष्य आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठीच खर्च होत असते , तरीही  ते शेवटपर्यंत समाधानी होत नसतात .
एक गरज संपली कि , दुसरी गरज निर्माण होते आणि या हव्यासापोटी सगळ्या वस्तू प्राप्त झाल्या , तरीही मनाचे समाधान होईल , असे काही नाही .

जे काही आपण स्वकष्टाने कामविलेले असते , ते सगळे येथेच सोडून द्यावे लागते , हे आपल्याला माहित असून हि माणूस अज्ञानी असल्यासारखा वागतो .

अज्ञान हा एक जीवनातील कलंक असतो , आणि असे अज्ञानी असणे हा आपल्या प्रगतीमागील एक मोठा अडथळा असतो .

 म्हणून माणसाला जी बुद्धी मिळाली आहे , त्या बुद्धीच्या बलाने , प्रज्ञेच्या बलाने आपण सदैव समाधानी राहिले पाहिजे .
पण आपण आज बघतो कि , आज अनेक लोक पद , पैसा , प्रसिद्धी , सत्ता मिळविण्याच्या मागे लागलेले असतात . एखादे पद , पैसा , प्रतिष्ठा आपल्याला मिळावे म्हणून लोक जीवाचे रान करताना दिसतात , एकमेकांवर दोषारोपण करतात , दिलेले शब्द पाळत नाहीत , त्यामुळे  त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होत नाही .

आनंद संपला कि , मनाची शांती नष्ट होते . हि शांती नष्ट झाली कि , जीवनात निराशा निर्माण होते आणि मनुष्य एकदा जीवनात निराश झाला कि , त्याला दुःख निर्माण होते .


म्हणून दुःखमुक्तीसाठी मनाचे समाधान असणे फार महत्वाचे असते .

मनात तुष्णा निर्माण होऊ देऊ नये .  जे मिळालेले असेल , त्यामध्ये समाधान मानावे . त्यासाठी आपल्याला आपल्या विचारांना बदलविणे फार महत्वाचे असते . आपल्याला जर दुःखमुक्त जीवन जीवन जगायचे असेल , तर आपण आपल्या स्वतः मध्ये योग्य तो बदल किंवा सुधारणा करून घेतली पाहिजे , आपण आपल्यामध्ये स्वयंशिस्त , निस्वार्थपणा , स्वावलंबन निर्माण करून स्वतः मध्ये बदल करू शकतो .
चांगल्या व्यक्तिमत्वामुळे आपल्या जीवनास खरा अर्थ प्राप्त होतो ।

जेव्हा आपल्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो , तेव्हा लोक आपल्या जीवनाचे अनुकरण करू लागतात . आपल्या जीवनाला आदर्श मानू लागतात . आपल्याला ते पुज्यनीय मानतात .

म्हणून आपले आचरण , हे नेहमी शुद्ध असले पाहिजे व अनुकरणप्रिय असले पाहिजे .

 आपले शुद्ध विचार म्हणजे कुशल विचार हे नेहमी दुसऱ्याच्या कल्याणाचे असले पाहिजेत , दुसऱ्याच्या मांगल्याचे असले पाहिजेत . 

आपले कुशल आचरण हे आपल्या कुशल विचारावर अवलंबून असते .

आपले आचरण हे आपल्या मनातील  प्रक्रियेवर अवलंबून असते .

आपल्या मनातील विचार हे आपले वर्तन प्रदर्शित करीत असतात .


म्हणून आपण चांगले विचार केले नाही , तर आपले जीवन वाया सुद्धा  जाऊ शकते ..


तथागत बुद्धांनी आपल्या जीवनात मनाला फार महत्व दिलेले आहे ।

आपल्या मनात विविध प्रकारचे विचार निर्माण होत असतात . काही विचार हे सुखमय असतात , तर काही विचार हे दुःखमय असतात .
 दुःखमय विचार हे निराशा निर्माण करणारे असतात .
म्हणून आपण मनाच्या अधीन न होता , आपण  आपल्या मनाला आपल्या अधीन ठेवले पाहिजे , ताब्यात ठेवले पाहिजे .
आपल्या मनाच्या मोठेपणावर आपले मोठेपण अवलंबून असते , 


काही लोक पैशाने खूप श्रीमंत असतात , परंतु ते सगळे मनाने श्रीमंत असतीलच असे  काही नाही .


माणसाची जडणघडण हि समाजासाठी झाली पाहिजे । 
मात्र , काही लोक विचाराने फार संकुचित वृत्तीचे असतात . दुसऱ्याचे मंगल करण्यापेक्षा माझाच कसा लाभ होईल , याचाच ते विचार करीत असतात .

परंतु अश्या या अकुशल विचारामुळे जीवनात दुःख प्राप्त होते ,


म्हणून दुःखमुक्त जीवन जगायचे असेल , तर इतरांच्या कल्याणाचा विचार आपण केला पाहिजे .


आपल्याला जर दुःखमुक्त जीवन जगायचे असेल तर ,
आपण मानवी कल्याणाचा विचार केला पाहिजे व आपल्या मनातील विचारांना महत्व दिले पाहिजे .

 तथागत बुद्धांनी आपल्या उपदेशात मानवी विचारांना व मनाला फार महत्वाचे स्थान दिले आहे .

मनाला केंद्रबिंदू मानलेले आहे . कारण कोणतीही घटना हि मनात निर्माण होणाऱ्या विचारावर अवलंबून असते .


म्हणून आपल्याला या जीवनात दुःखातून मुक्त व्हायचे असेल तर आपले मन आणि मनात निर्माण होणाऱ्या मंगलमय विचारांना महत्व दिले पाहिजे .



लेखक : डॉ . पुरुषोत्तम उपर्वट / मो . ९८५०२८११५० 
संकलन . सचिन डावरे ,

आभार ; दै सम्राट ..






1 comment:

  1. सर्वात सुंदर विचार आहेत 🙏🙏🙏🙏😊😊😄☺☺🇮🇳🇮🇳🇮🇳

    ReplyDelete